Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस : ३.३९ लाखाचा मुद्देमाल जप्त करत सराईत आरोपी जेरबंद : एलसीबीची कारवाई

मिरजेतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस : ३.३९ लाखाचा मुद्देमाल जप्त करत 
सराईत आरोपी जेरबंद : एलसीबीची कारवाई 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगलीमध्ये मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली एक महत्त्वाची व मोठी कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली असून, एका बंद घराचे कुलूप तोडून झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी रेकॉर्डवरील एका सराईत आरोपीला जेरबंद केले आहे. 

कैस मुबारक बोजगार (वय २७ वर्षे, रा. गोसावी गल्ली, पंढरपूर रोड, मिरज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरज शहरातील आयोध्यानगर, पंढरपूर रोड येथील फिर्यादी अजिंक्य चंद्रकांत जगताप हे नवरात्र मिरवणूक पाहण्यासाठी गेलेले असताना, दिनांक २० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६ च्या दरम्यान अज्ञात चोराने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप दगडाने तोडले. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी एकूण ३ लाख ३७ हजार ९८० रुपयांची चोरी करून चोर पळून गेला होता. याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे कडक आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. या आदेशाचे पालन करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व त्यांच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.

तपासादरम्यान दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अंमलदारांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी कैस बोजगार हा चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी मिरज ते पंढरपूर रोडवरील बालाजी मंगलकार्यालयासमोर येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संबंधित परिसरात सापळा रचला. पिशवी घेऊन थांबलेल्या संशयित कैस बोजगार याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आली. कसून चौकशी केली असता त्याने शेजारीच राहणाऱ्या जगताप यांच्या घराचे कुलूप तोडून ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ७० हजार ९८० रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १ लाख ६७ हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ३७ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी आणि जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, सुभाष सुर्यवंशी, अमिरशा फकीर, संदीप नलावडे, मच्छिंद बर्डे, सतिश माने, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, सागर लवटे, अमर नरळे, दरीबा बंडगर, मोतीराम खोत, नागेश खरात, राजाराम मुळे, अतुल माने, संदीप गुरव, उदय माळी, विक्रम खोत, विनायक सुतार, अजय पाटील, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.