2 बड्या पोलीस अधिकाऱ्यांचं अपहरण करून अमानुष हत्या, गोळ्या घालून शरीराची केली चाळण, देशाला हादरवणारी घटना !
जम्मू : खरा पंचनामा
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील दच्छन भागातून बुधवारी बेपत्ता झालेल्या दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे (SPO) मृतदेह गुरुवारी घनदाट जंगलात आढळले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांच्या शरीरावर गोळ्यांच्या अनेक खुणा आढळून आल्या असून दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करून निघृण हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर सुरक्षा दलांनी संबंधित दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. बाबी चंद (वय ५७) आणि रशपाल कुमार (वय ४५) अशी हत्या झालेल्या दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दच्छन येथील कियार गावातील स्थानिक पोलिसांच्या 'स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप'मध्ये (SOG) कार्यरत असलेले बाबी चंद आणि रशपाल कुमार हे बुधवारी आपल्या कॅम्पमधून धरना-मरवाह येथील लष्कराच्या चौकीकडे जात होते. यादरम्यान उंच डोंगराळ आणि दुर्गम जंगली भागातून ते अचानक बेपत्ता झाले. त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. काही वेळातच त्यांचे मोबाईल फोन स्विच ऑफ झाले.
दोन्ही पोलीस अधिकारी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी बुधवारपासूनच मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली होती. दुर्गम डोंगराळ मार्ग आणि घनदाट जंगलात शोध घेण्यासाठी विशेष पथकांसह ड्रोन आणि श्वान पथकाची मदत घेण्यात आली. गुरुवारी या शोधमोहिमेदरम्यान दच्छनच्या जंगलात दोन्ही अधिकाऱ्यांचे मृतदेह आढळून आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाले होते, तेथून सुमारे २ किलोमीटर अंतरावर त्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्या शरीरावर गोळ्या झाडल्याच्या अनेक खुणा आहेत.
किश्तवाड हा भाग सातत्याने दहशतवादविरोधी कारवायांचे केंद्र राहिला आहे. या भागात सुरक्षा दलांनी राबवलेल्या मोहिमांमुळे अनेक सक्रिय दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. ताज्या घटनेनंतर या अपहरण आणि हत्येत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी संपूर्ण जंगल परिसरात नाकाबंदी करून व्यापक सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.