Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शासन नियुक्त ४ संचालक फक्त तीन महिने राहणार, सतेज पाटलांनी सांगितली राजकारणापलीकडची गोष्ट

शासन नियुक्त ४ संचालक फक्त तीन महिने राहणार, सतेज पाटलांनी सांगितली राजकारणापलीकडची गोष्ट

कोल्हापूर : खरा पंचनामा 

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक काल पार पडली. महायुतीचे राजेश पाटील अध्यक्ष झाले असले, तरी संघातील सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत. 

आमदार सतेज पाटील यांनी चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीमागील कथित राजकीय रणनीतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे चार संचालक केवळ तीन महिन्यांसाठी नियुक्त करण्यात आले असून, त्यानंतर पराभूत झालेल्या उमेदवारांना संचालक करण्याची तयारी असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यामुळे गोकुळमधील सत्तासमीकरणांसह शासननियुक्त संचालकांच्या भवितव्याबाबत नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे राजेश पाटील यांनी १६ मते मिळवत विजय मिळवला, तर सतेज पाटील यांच्या आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील-चुयेकर यांना १३ मते मिळाली. चार शासननियुक्त संचालकांनी मतदानाचा हक्क बजावल्याने महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना शासनाच्या भूमिकेवर टीका केली.

सतेज पाटील म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी पडलेल्या लोकांना संचालक करणार नाही, असे सांगितले होते. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शासननियुक्त संचालक केवळ तीन महिन्यांसाठी नेमले आहेत. त्यानंतर निवडणुकीत पराभूत झालेल्या लोकांना संचालक करण्याची तयारी असल्याची माहिती आहे." काही स्वीकृत संचालकांचे सहा महिन्यांचे अनुभव प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

आमच्याकडे बहुमत असतानाही चार संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. मुख्यमंत्री सकारात्मक बोलत असताना दुसरीकडे महाडिक वेगळी भूमिका मांडत होते. आम्हाला गाफील ठेवण्याचा प्रयत्न झाला. निवडणूक प्रक्रियेत कोरमची आवश्यकता नसतानाही सरकारने अध्यादेश काढला. गोकुळ ताब्यात घेण्यासाठीच हा अध्यादेश काढण्यात आल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरही सतेज पाटील यांनी टीका केली. "चंद्रकांतदादा जेवढे मोठे होत आहेत, तेवढी त्यांची वैचारिकता कमी होत आहे. डी. वाय. पाटील यांच्यावर बोलून काय मिळवले? मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला आणि आता त्यांनाच वादात ओढले जात आहे. सरकारी यंत्रणांचा वापर करून मला धमकावण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होत आहे. पण हे मी खपवून घेणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.

न्यायालयाने मतदानाबाबत निर्णय दिल्याने आम्ही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालो नाही. न्यायालयातून निकाल उलट आला, तर १३ जणांनी घरी जायचे, असे सांगत त्यांनी प्रशासक नियुक्तीचाही मुद्दा उपस्थित केला. चुकीचे काम झाले तर विरोध करू; मात्र गोकुळमध्ये चांगले काम होत असेल तर आमचा पाठिंबा असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

अध्यक्षपदाची निवडणूक संपल्यानंतरही शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा कालावधी, त्यांच्या जागी नव्या संचालकांची संभाव्य नियुक्ती आणि न्यायालयीन लढाई या मुद्द्यांवरून गोकुळमधील राजकीय संघर्ष पुढे सुरू राहण्याचे संकेत सतेज पाटील यांच्या वक्तव्यांतून मिळत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.