Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बाळासाहेबांचा फोटो फाडल्याप्रकरणी शायना एनसी यांचा अखेर माफीनामा; शिवसैनिकांची मागितली माफी

बाळासाहेबांचा फोटो फाडल्याप्रकरणी शायना एनसी यांचा अखेर माफीनामा; शिवसैनिकांची मागितली माफी



मुंबई : खरा पंचनामा 

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याच्या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी अखेर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांनी शिवसैनिक आणि बाळासाहेबांच्या चाहत्यांची माफी मागितली. मात्र, माफी मागतानाच विरोधकांकडून या घटनेचा राजकीय फायदा घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी करण्यात आलेल्या उल्लेखांवरून शिंदे गटाच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी करत शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पुस्तकाच्या प्रती फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. या पत्रकार परिषदेला शायना एनसी यांच्यासह संजय निरुपम, शीतल म्हात्रे, संजना घाडी, आनंद दुबे आणि सुषिबेन शाह उपस्थित होते.

या आंदोलनादरम्यान पुस्तकाच्या प्रती फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असलेला कागदही फाडला गेला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ठाकरे गटाने या घटनेचा तीव्र निषेध करत शायना एनसी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. संजय राऊत, किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांनीही या मुद्द्यावरून शिंदे गटाला लक्ष्य केले. काँग्रेस नेत्यांनीदेखील या घटनेचा निषेध केला.

यानंतर शायना एनसी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर स्पष्टीकरण दिले. बाळासाहेब ठाकरे हे आपल्यासाठी पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. लहानपणापासून त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. ते आपल्या वडिलांचे जिवलग मित्र होते. आपल्या लग्नालाही ते उपस्थित राहिले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.

बाळासाहेब हे प्रखर देशभक्त, हिंदुत्ववादी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते होते. त्यांच्याविषयी आपल्या मनात प्रचंड आदर आहे. आपल्या कृतीमुळे शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मनापासून माफी मागते, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, बाळासाहेबांवरील आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांनाही प्रत्युत्तर दिले. या माफीनाम्यानंतर राज्यातील राजकीय वादाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.