सोलापूर : खरा पंचनामा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपला सत्तेबाहेर ठेवल्याने महायुतीमधील धुसफूस पुन्हा समोर आली आहे. यावरून जयकुमार गोरे यांनी मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर सोलापुरातून जोरदार पलटवार केला. "दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती," अशा शब्दांत गोरे यांनी देसाईंवर निशाणा साधला.
शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादीने जिल्हा बँकेत सत्ता स्थापन केली आहे. या सत्तेत राष्ट्रवादीला अध्यक्षपद तर शिवसेनेच्या उमेदवाराला उपाध्यक्षपद मिळाले. या निवडीनंतर 'आमची जखम भरून निघाली', अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली होती. यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
जर मुख्यमंत्र्यांनी युतीचा आदेश दिला नसता, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सत्तेत आली नसती, त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत, असा टोला गोरे यांनी लगावला.
बँकेची निवडणूक आम्ही शिवेंद्र महाराजांच्या नेतृत्वात लढलो असून चर्चेचे सर्व अधिकार त्यांनाच होते. त्यामुळे तिथे नेमकी काय चर्चा झाली याची आपल्याला कल्पना नसल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्हा परिषद निवडणूक आम्ही एकमेकांच्या विरोधात स्वतंत्र लढलो होतो, मात्र बँक निवडणूक महायुती म्हणून लढल्याने या दोन्हींची तुलना होऊ शकत नाही, असे गोरे म्हणाले. आमच्या मतांवर निवडून आलेल्या संचालकांनी चेअरमन निवडला आहे. जिल्हा परिषदेप्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढले असते, तर त्यांना जखम भरून निघण्याबाबत बोलण्याचा अधिकार होता. मात्र, जखम भरून निघण्यासाठी अघोरी विद्येचा वापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात, असा इशारा गोरे यांनी देसाईंना दिला.
सातारा जिल्हा बँकेची ही काही शेवटची निवडणूक नाही, 'जे पेराल तेच उगवते' हे ध्यानात ठेवा, असेही गोरे म्हणाले. भाजपला डावलल्याचा संताप व्यक्त करतानाच, आता यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे म्हणत त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सावध केले. तसेच, हा राज्याचा नव्हे तर केवळ एका जिल्ह्याचा विषय असल्याने त्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचेही गोरे यांनी शेवटी नमूद केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
